बीड : मी भाजपच्या संस्कारात, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ती आहे. त्यामुळे पक्षाचा, संघटनेचा प्रोटोकॉल पाळते; पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमाला जाणे मला बंधनकारक नाही. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्याने नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. माझ्या नाराजीबाबत प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे. त्यांना मी ओव्हरटेक करीत नाही. प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले हीच मोठी गोष्ट आहे. त्या दोन्ही कार्यक्रमांत मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे आले नाही. आज गेवराईतील पक्षाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. यापूर्वीही जे. पी. नड्डा आले होते तेव्हा मी आले होते, असेही पंकजा म्हणाल्या.
पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर श्री संत वामनभाऊंच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते; पण भाजप नेत्या पंकजा मुंडे या गैरहजर राहिल्याने राजकीय गोटात मोठी चर्चा झाली. मुंडे या शिवसेनेत जाणार अशीही चर्चा होती. मुंडे यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने तर्कवितर्क लावले जात होते; परंतु गेवराईत शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे एका व्यासपीठावर दिसले. यावेळी मुंडे यांनी स्वत:च या चर्चेला पूर्णविराम दिला.
गेल्या २० दिवसांत बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री फडणवीस दोनवेळा येऊन गेले. त्यांच्या दोन्ही कार्यक्रमाला पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी होती. या दोन्ही ताईंच्या गैरहजेरीची चर्चा झाली. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. त्यात ठाकरे गटाचे शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी मुंडे यांना सेनेत येण्याची खुली ऑफर दिली. यामुळे भाजपमधील मोठ्या नेत्यांकडून मुंडे विरोधकांना बळ दिले जात असल्याचीही चर्चाही कार्यकर्त्यांत होती. गहिनीनाथ गडावरील कार्यक्रम आणि बीड शहरातील शिवसंग्रामच्या व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीला फडणवीस हजर होते; पण दोन्ही ताई गैरहजर होत्या. यामुळे जिल्ह्यात फडणवीस हे मुंडे यांच्याविरोधात विरोधकांना बळ देतात की काय? यावरून फडणवीस यांनाही टीकेला सामोरे जावे लागले. यापूर्वीही मुंडे यांच्या नाराजीची अनेक वेळा चर्चा झाली; पण त्यांनी वेळोवेळी खंडन केले.