बीड : मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न यामुळे एक विस्तार अधिकारी खासगी सावकारांच्या कचाट्यात सापडला. मात्र, पैशांची परतफेड करूनही अव्वाच्या सव्वा व्याज आकारून सतत धमकावत मारहाण करून जाच सुरू होता. यामुळे मी सहन करू शकत नाही, मला माफ करा... असा व्हॉट्सॲप मेसेज कुटुंबीय व नातेवाइकांना पाठवून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन आठवड्यानंतर पाचजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंद झाला. आरोपींमध्ये राजकीय पक्षाशी संबंधित व्हाईट कॉलर लोकांचा समावेश आहे.
पंकज बबन काळे (वय २१, रा. जिजामाता चौक, तुळजाई निवास, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. बबन उत्तमराव काळे हे माजलगाव येथील पंचायत समितीत विस्तार अधिकार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये दहा रुपये शेकडा दराने खासगी सावकार किशोर बाजीराव पिंगळेकडून सात लाख घेतले होते. या बदल्यात रोहितळ (ता. गेवराई) येथील ६० आर जमीन तसेच बीडमधील पत्नीच्या नावे असलेले राहते घर नोटरी करून घेतले होते. सव्याज रक्कम परत केल्यानंतरही धनादेश अनादर केल्याच्या नावाखाली पत्नीवर गुन्हा नोंद केला. पुढे काळे यांनी राजकुमार गुरखुदे याच्याकडून साडेपाच लाख, हनुमंत पिंगळेकडून सात लाख व आशिष सोनी याच्याकडून एक लाख व्याजाने घेतले.
दरम्यान, पैसे परत करूनही वेळोवेळी घरी येऊन पैशासाठी धमकावले, लाथाबुक्क्याने व चापटाने मारहाण केली. १ मे रोजी बबन काळे हे ध्वजारोहणासाठी माजलगावला गेले होते. घरातील इतर मंडळी बाहेरगावी होती. घरात अभियांत्रिकी शिक्षण घेणारा मुलगा पंकज हा एकटाच होता. वडिलांना व कुटुंबीयांना सततच्या होणाऱ्या जाचास कंटाळून घराच्या वरील पत्र्याच्या खोलीत हुकाला साडीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. तपास सपोनि महादेव ढाकणे करत आहेत.
एक आरोपी अटकेत, चौघे फरारसुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. १४ मे रोजी बबन काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून किशोर पिंगळे, त्याचा भाऊ रणजित पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमंत ऊर्फ बंडू पिंगळे व आशिष सोनी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. किशोर पिंगळे हा माजी नगरसेविका सुभद्रा पिंगळे यांचा मुलगा आहे. आशिष सोनी हा अटकेत असून, इतर चौघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पो. नि. रवी सानप यांनी सांगितले.