धारुर ( बीड ) : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अंमलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आडस चौकीत मंगळवारी ( दि. २२ ) सायंकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली. तेजस वाहुळे असे लाचखोर पोलीस नाईकचे नाव आहे.
धारुर ठाण्यात एका प्रकरणात दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या. दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणाचा तपास तेजस वाहुळे यांच्याकडे होता. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी एका गटाकडे त्यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे या गटाने वाहुळेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. याबाबत एसीबीकडे तक्रार आल्यानंतर लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी आडस येथील चौकीत एसीबीने सापळा लावला. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान तक्रारदारांकडून १० हजार रुपये स्वीकारताच तेजस वाहुळे यास एसीबीने रंगेहाथ पकडले.
एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शलनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस व सहकाऱ्रूांनी ही कारवाई केली. याप्रकरणी धारुर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.