बीड : उसनवारी करून पै- पै जमवून तीन लाख देऊन प्रेमप्रकरण मिटवलं, पण माझ्या लेकाला शेवटी मारलं... माझ्या डोळ्यादेखत छातीत चाकू खुपसला हो.... अशा शब्दांत मृत तरुणाच्या आईने २६ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आक्रोश केला. नाथापूर (ता. बीड) येथे प्रेम प्रकरणातून तरुणाची २५ जून रोजी हत्या झाली. या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्याच्या मागणीसाठी मृताच्या मातेसह नातेवाईक महिलांनी अधीक्षक कार्यालय गाठून ठिय्या दिला. दरम्यान, पिंपळनेर ठाणे व गुन्हे शाखेने वेगाने प्रेयसीसह चौघांना ताब्यात घेतले.
तालुक्यातील नाथापूर येथे २५ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता सुंदर साहेबराव कसबे (वय २२, रा. पिंपळादेवी, ता. बीड) या तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली. वडील, आई, तीन मुली व तीन मुले असा सुंदरचा परिवार आहे. तिन्ही बहिणींचा विवाह झाला असून, तीन भावांमध्ये तो थोरला होता. पवन व पांडुरंग ही त्याची लहान भावंडे. संपूर्ण कसबे कुटुंब ऊसतोडीचे काम करते. गतवर्षी ते ऊसतोडीसाठी कर्नाटकात गेले होते. तेथे सुंदरची ओळख लऊळ क्र. २ (ता. वडवणी) येथील काजल चांदणे (२२) हिच्याशी झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. कर्नाटकातच असताना सुंदर व काजलने पलायन केले. मात्र, दोन दिवसांनी ते परत आले. यावरून दोन कुटुंबांतील वाद टोकाला गेला. मात्र, मुकादमांनी मध्यस्थी केल्यावर काजलच्या वडिलांना तीन लाख रुपये दिले, असा दावा मृत सुंदरची आई लता यांनी केला.
पळवून नेल्याचा होता रागदोन महिन्यांपूर्वी गावी परतल्यावर काजलचा विवाह योगेश केरबा मांजरे (रा. कवडगाव, ता. वडवणी) याच्याशी लावून दिला. मात्र, प्रेम प्रकरणातून काजलला पळवून नेल्याच्या रागातून नाथापूर येथे गाठून सुंदर कसबेची हत्या केली. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांकडे दिला. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
माजलगाव, लऊळमधून आरोपी ताब्यातगुन्हे शाखेचे पोनि सतीश वाघ व पिंपळनेर ठाण्याचे सपोनि बाळासाहेब आघाव यांनी तपास पथके रवाना केली. योगेश केरबा मांजरे, काजल योगेश मांजरे (दोघे रा. कवडगाव, ता. वडवणी), काजलचे वडील बाबासाहेब शिवाजी चांदणे (वय ४५), आई रेखा बाबासाहेब चांदणे (वय ४०, दोघे रा. लऊळ क्र. २, ता. वडवणी) यांना दिनांक २६ रोजी बेड्या ठोकल्या. योगेश व बाबासाहेब यांना माजलगावातून, तर रेखा व काजल यांना गावातून ताब्यात घेतले. उपनिरीक्षक संजय तुपे, अशोक दुबाले, कैलास ठोंबरे, शेख नसीर, राहुल शिंदे, गणेश मराडे, हवालदार प्रभाकर उबाळे, अशोक दराडे, पोना रामप्रसाद कडुळे, संजय सुरवसे यांनी ही कारवाई केली.