बीड : पोटात खूप कळा येत होत्या. रक्तस्त्रावही होत होता. त्यामुळे शौचालयात गेले. याचवेळी रक्ताचा गोळा पडल्यासारखे वाटले. प्रसुती झाली, असे जाणवलेच नाही, अशी माहिती नवजात अर्भकाला शाैचालयात टाकणाऱ्या मातेने पोलिसांना दिली आहे. घटनेनंतर अवघ्या १४ तासांत पोलिसांनी मातेचा शोध घेत या प्रकरणाचा छडा लावला. आता ही महिला पोलिसांच्या ताब्यात आहे.
बीड शहरातील जालना रोडवरील वीर हॉस्पिटलच्या शौचालयात एक नवजात अर्भक मयत अवस्थेत आढळले होते. यात एका महिलेवर संशय आला होता. यात डॉ.संजय वीर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मातेविरोधात बीड शहर ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली. संशयित महिलेचा तपास घेण्यास सुरूवात केली. परंतु रात्रभर तिचा शोध लागला नाही. सकाळी १० वाजेच्या सुमारास ही महिला शाहुनगर भागातील गणपती मंदिराजवळ असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी पथक पाठविले. राहत्या घरून या महिलेला ताब्यात घेत शहर ठाण्यात आणले.
खूप त्रास होत होता म्हणून शौचालयात गेले. अगोदरच रक्तस्त्राव होत असल्याने मला वाटले रक्ताचा गोळा पडला असेल. प्रसुती झाली हे जाणवलेच नाही. बाहेर आल्यावर थोडा त्रास कमी झाला होता, असे ठाण्यात विचारपूस केल्यावर या महिलेने सांगितले. दवाखान्यातून पतीसह घरी गेल्याचे या महिलेने पाेलिसांना माहिती दिल्याचे सूत्रांकडून समजते. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवि सानप, सपोनि घनश्याम अंतरप, महावीर सोनवणे, मनोज परजणे, राहुल गुंजाळ, आशामती जावळे यांनी केली.
अर्भकाचे शवविच्छेदन राखीव
शौचालयात सापडलेल्या नवजात अर्भकाचे शवविच्देदन अद्यापही करण्यात आलेले नाही. त्याचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्यात आला आहे. कायदेशीर बाबी पूर्ण होताच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिकारी अंतरप यांनी सांगितले.
रोजगारासाठी उत्तराखंडहून बीडमध्ये
संबंधित माता ही पतीसह उत्तराखंड येथून दोन वर्षांपूर्वीच बीडमध्ये आली आहे. या महिलेचा पती जालना रोडवरील हॉटेलमध्ये नोकरीला आहे. दोन दिवसांपूर्वीच ही महिला उत्तराखंड, दिल्ली असा प्रवास करून बीडला आली होती. यात तिला खूप त्रास झाल्याचे तिने सांगितले आहे. हा त्रास वाढल्याने ते वीर हॉस्पिटलला आले होते.
कोट
अर्भक प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. सदरील मातेला शोधले आहे. तिची वैद्यकीय तपासणी केली जाईल. इतर कायदेशीर बाबी तपासण्याचे काम सुरूच आहे.
रवि सानप
पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे बीड