परळी: मुंडे कुटुंबाच्या दोन पिढ्या तुमच्या सर्वांची सेवा करण्यात गेल्या. आजही आम्हाला सेवेची संधी मिळते ती तुमच्याच आशीर्वादाने, आपण मतदारसंघात विकासासाठी दिलेला प्रत्यक्ष शब्द पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रचंड प्रमाणात विकास निधी खेचून आणला, परंतु आपल्याला राजकारणातून संपविण्याचे प्रयत्न देशपातळीवर एका नेत्याकडून केले जात असल्याचा आरोप राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.
महायुतीचे तिकीटवाटत चर्चा अद्याप सुरू आहे. मात्र, तिन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात प्रचार सुरू केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील परळी विधानसभा मतदारसंघातील पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटातील बागझरी येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन शुक्रवारी रात्री प्रचाराचा श्रीगणेशा केला. धनंजय मुंडे यांनी २००२ मध्ये पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटाची पहिली निवडणूक लढविली होती. तेव्हा ही प्रचाराचा शुभारंभ त्यांनी बागझरीच्या याच दत्त मंदिरात दर्शन घेऊन केला होता व विजय मिळविला. त्यामुळेच बादलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यास मुंडे यांनी प्राधान्य दिले आहे.
मला राजकारणातून संपविण्याचे षडयंत्रयावेळी मतदाराशी संवाद साधताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, देश पातळीवरील काही उच्चपदस्थ नेते माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मला राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र रचल्या गेले आहे. परंतु, मला तुमच्या आशीर्वादाने आज पर्यंत इथवर आणले आहे. त्याला तुम्हीच निर्माण केले आज त्यालाच संपवण्याची भाषा केली जात असेल, तसे आव्हान दिले जात असेल तर अशा लोकांना तुम्ही मतदानातून जागा दाखवून द्या, असे आवाहन यावेळी मुंडे यांनी केले. तसेच मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. ज्यादिवशी जात बघून, जात दाखवून मतदान मागायची माझ्यावर वेळ येईल त्यादिवशी मी राजकारण सोडून देईल, अशी भावनिक साद मुंडे यांनी यावेळी घातली. यावेळी विश्वंभर फड, गणेश कराड, बबन मुंडे, लिंबराज लहाने,विनोद लहान, प्रशांत दहिफळे, माने , धनंजय सोळंके यांच्यासह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती.