बीड : बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना आ.विनायक मेटे यांचे स्वीय सहाय्यक विनोद कवडे यांनी ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी दुपारी बीड नगर पालिकेत घडला. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी कोठेही नोंद नव्हती.
मुख्याधिकारी दोरकुळकर हे मंगळवारी दुपारी कार्यालयीन कामकाज करीत होते. याचवेळी कवडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांनी कागदपत्रांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना विचारली. त्यांनीही दिली. मात्र, बोलता बोलता काही त्रुटींवरून दोघांत शाब्दीक चकमक झाली. याचवेळी कवडे यांनी तोंडून मुख्याधिकाऱ्यांना ‘बघुन घेतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनाही राग अनावर झाला आणि ‘काय बघुन घेतो’ असे म्हणत त्यांनीही प्रत्युत्तर दिले. मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात गोंधळ झाल्याचे पाहून आरडाओरडा ऐकून पालिकेतील इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दोघांचा वाद मिटविला. यामुळे पालिकेचे कामकाजही काही वेळ ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेधही नोंदविला आहे. मात्र, या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी कसलीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.
वादाचा व्हिडीओ व्हायरलमुख्याधिकारी व स्वीय सहायकांच्या वादाचा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी याचा निषेध नोंदवित संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. बुधवारी संघटना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत.
धमकी दिल्याने राग अनावर कागपत्रांच्या त्रुटी असतील तर त्या विचारण्याची पद्धत असते. ‘बघुन घेतो’ अशी धमकी दिल्याने राग अनावर झाला. मात्र, संबंधिताने बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे मी तक्रार दिली नाही.- रोहिदास दोरकुळकर, मुख्याधिकारी, नगर परिषद बीड
वाद झाले की नाही माहित नाही बीडमधील रस्त्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी आणला. दोन महिन्यांपासून योग्य ती कार्यवाही करून याचे टेंडर काढा म्हणून विनंती केली. रस्ते झाले तर नागरिकांनाच फायदा होणार आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नव्हती. याच संदर्भात माझा स्वीय सहायकही भेटायला गेला होता. वाद झाले किंवा नाही, हे माहिती घेऊन सांगेल.- आ.विनायक मेटे, बीड