बीड- गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठ्यांनी केलेल्या अनेक आंदोलनानं सत्ताधारी भाजपाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला आहे. परंतु आता भाजपाच्या पंकजाताई मुंडेंनीच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे फाईल असती तर मराठ्यांना झटक्यात आरक्षण दिलं असतं, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या आहेत.मी मराठा बांधवांची दूत बनणार असून, मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानपर्यंत जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. त्या परळीमध्ये बोलत होत्या. मुलांनी आक्रोश केल्यानंतर आई-वडिलांनी लाथाडायचं नसतं. त्यांना जवळ घेऊन समजावण्याची गरज असते. मला जातीपातीचं राजकारण करायचं नाही. पण मराठ्यांना आरक्षणा हे मिळालंच पाहिजे. मागील आठ दिवसांपासून परळी तहसील कार्यालयाच्या परिसरात मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन सुरू आहे.आज या आंदोलनास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. आंदोलकांना आरक्षणाची लढाई जिंकायची आहे, यासाठी बलिदान देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.
शिवरायांची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे फाईल असती तर झटक्यात आरक्षण दिलं असतं- पंकजा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 3:55 PM