परळी (बीड) : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जून या स्मृतिदिनाचे स्मरण करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज फेसबुक पोस्टद्वारे सर्वांना एक भावनिक आवाहन केले आहे. आजपासून सर्वांनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतीस्थळ गोपीनाथ गडाचा फोटो आपल्या प्रोफाईलवर ३ जून पर्यंत ठेवण्याचं आवाहन त्यांनी केले. २६ मे ते ३ जून असा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू अशी भावनिक साद त्यांनी पोस्टच्या माध्यमातून घातली.
परळी सारख्या छोट्या शहरातून देशपातळीवर नाव गाजवणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आमदार, उपमुख्यमंत्री आणि नंतर खासदार व केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश हा प्रवास प्रेरणादायी आहे. २०१४ साली देशात भाजपने एकहाती बहुमत मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली. २६ मे २०१४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यानंतर अवघ्या आठवडा भरात ३ जूनला त्यांचे अपघाती निधन झाले.
२६ मे ते ३ जून हा कालखंड यामुळेच सर्वांच्या चिरकाल स्मरणात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक आवाहन केले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडाचा फोटो शेअर करत पंकजा मुंडे यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली असून यात संघर्षयोद्धा आणि आपल्या पित्याचे त्यांनी स्मरण केले आहे.
"संघर्ष की बडी-बडी व्याखाएं कर रहे थे सभी । मैंने पिता लिखकर सब को मौन कर दिया..।''अशा शब्दांत पंकजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यासोबतच, '' 26 may... संघर्ष आपल्या सर्वांचा आणि आपला विश्वास शपथ घेत होता मोदींजींच्या मंत्री मंडळात... 3 June पर्यंत हे profile ठेवू आणि साहेबांचा 26 may ते 3 June चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू ....'' असे आवाहन ही पंकजा मुंडे यांनी केले आहे. या वेगळ्या प्रकारच्या अभिवादानास सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. गोपीनाथ गड या स्मृतीस्थळाचा फोटो प्रोफाईलवर ठेवत लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना सर्वजण उजाळा देत आहेत.