लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी कोथिंबीरवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात सलोखा राखण्यासाठी आपसातील वादविवाद, मतभेद बाजूला ठेवत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. या गावातील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या जहागीरमोहा, रुईधारूर, भोपा, कासारी, कोथींबीरवाडी या पाच ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोथिंबीरवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले. यामध्ये शामबाला युवराज वैरट, विनोद सत्यप्रेम ढोरे, श्रीधर वैजनाथ पंडित, शारदा कारभारी कोथिंबीरे, भागिर्थी वैजनाथ पंडित, आश्रूबा नामदेव जाधव, रामकंवर दत्ता कोथिंबीरे यांचा समावेश आहे. या उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले. गावातील सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कोथिंबीरवाडी ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर गेल्या ४० वर्षांत या ग्रामपंचायतीची निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी एकदा येथील निवडणूक बिनविरोध झाली होती. माजी सरपंच युवराज वैरट, विनोद ढोरे आदींनी पुढाकार घेत बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केले. ग्रामपंचायत निवडणूक गट-तटात झाली तर वादविवाद वाढतात, गावातील वातावरणही खराब होते. विनाकारण मतभेद, मनभेद वाढतात याचा विचार करून सर्वपक्षीय मतभेद बाजूला ठेवत ग्रामपंचायत निवडणूक गावाचे हित समोर ठेवत बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सर्वांनी एकत्रितपणे हे अवघड काम यशस्वी केले.