लोकमत न्यूज नेटवर्कबीड : देवदर्शनासाठी जालना येथे नातेवाईकांकडे गेली. मंदिरात ओळख झाली. नंतर मोबाईलमुळे बोलणे वाढले आणि प्रेम घट्ट झाले. यातूनच त्याने तिला घेऊन धूम ठोकली. दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी चंदनझिरा (जि. जालना) पोलिसांच्या मदतीने दोघांनाही चंदनझिरा येथून दिंद्रूड पोलिसांनी ताब्यात घेतले.रवी उर्फ चिवळ्या जाधव (२२ रा.चंदनझिरा जि.जालना) असे या आरोपी मुलाचे नाव आहे. पीडित मुलगी ही नववीत शिक्षण घेत असून दिंंद्रुड गावातील रहिवासी आहे. दोघेही नात्यातीलच आहेत.दोन वर्षांपूर्वी पीडिता ही जालना येथे कार्यक्रमासाठी गेली. येथे रवीसोबत मुलीची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे मोबाईलवरून बोलणे वाढले. यामुळे मैत्री आणि नंतर प्रेम झाले.२५ डिसेंबर रोजी रवी मुलीला घेऊन पसार झाला. याची दिंद्रुड पोलीस ठाण्यात नोंद झाली. सपोनि सचिन पुंडगे यांनी तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक कपिल बुद्धवार, सुरेवाड, भालेराव यांचे पथक नियुक्त करून तपासाला गती दिली. दोन दिवस रवीच्या गावात ठिय्या मांडला, मात्र ते मिळाले नाहीत. चंदनझिरा पोलिसांना याबाबत माहिती दिली. सोमवारी या दोघांनाही त्यांच्या मदतीने ताब्यात घेतले. रात्री उशिरा ते जालना येथून बीडला रवाना झाले होते.२०१९ चा पहिला गुन्हा२०१८ संपल्यानंतर २०१९ या वर्षातील दिंद्रूड पोलीस ठाण्यात मुलीला पळवून नेल्याचा हा पहिला गुन्हा दाखल झाला. याचा शोध घेऊन ठाण्याची वर्षाची सुरूवात चांगली झाली आहे.
मंदिरात ओळख, मोबाईलमुळे प्रेम घट्ट अन् नंतर ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:51 AM