केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मकोका लावला, तसेच सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू असताना जर एकही आरोपी सुटला, तर आम्ही कुटुंब टोकाचे पाऊल उचलू. याला शासन जबाबदार राहील, असा इशारा सरपंच संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे पोलिस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना कोणीही दगाफटका करू नये. ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. आष्टी येथील भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीने आपल्या मनात कसलीही चलबिचल झालेली नाही; परंतु या प्रकरणात एखादा आरोपी वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये. सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ही आपली प्रामाणिक इच्छा असल्याचेही देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कृष्णा आंधळे मोकाट फिरला
देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे असतानाही तो तब्बल दोन वर्षे पोलिसांच्या नाकावर टिच्चून केजमध्ये उघडपणे फिरत होता. त्याला पोलिसांनी वेळीच आवर घातला असता, तर ही घटना घडलीच नसती.
कृष्णाला अभय देणारे कोण आहेत? हे तपास यंत्रणेला माहीत आहे, असेही देशमुख म्हणाले, तसेच यातील सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.