बीड : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असून २८ जूनपर्यंत ५ लाख २२ हजार ७५४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सध्या १८ वर्षांपुढील तरुणाईची लसीकरणासाठी गर्दी होत आहे. लसीकरणानंतर संबंधितांना काही वेळातच त्यांच्या लसीकरणाची नोंदणी व लसीकरण यशस्वी झाल्याचा संदेश व प्रमाणपत्र मिळते. परंतु काहींना लसीकरणानंतर हे प्रमाणपत्र उशिराने मिळते. तर काहींना दुसऱ्या डोसची वेळ आल्यानंतर पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र शोधण्याची वेळ येते. पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा मिळणार याची चिंताही अनेकांना सतावत असते. अशा अडचणी आल्यानंतर धावपळ होते. ती टाळण्यासाठी लसीकरणावेळी सजगता असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात माजलगाव येथे केंद्रावर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांची गर्दी झाली होती. लसीकरणाचा पहिला डोस घेऊनही संबंधित २०० ते ३०० नागरिकांना प्रमाणपत्र मिळाले नाही. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही त्यांना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने अडचणी आल्या. आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून झालेली तांत्रिक चूक सुधारण्यात आली. अशा व्यक्तींची स्वतंत्र नोंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
----------
मी लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी गेलो असता निश्चित कोडसाठी पहिल्या डोसच्या प्रमाणपत्राबद्दल विचारले. ती नोंद माझ्या मोबाईलवरून केली होती. परंतु सोबत मोबाईल नव्हता. त्यामुळे अन्य व्यक्तीकडून घरी फोन लावून त्याआधारे ओटीपी प्राप्त केला. त्यानंतर तत्काळ दुसरा डोस मिळाला. -- सुदाम चव्हाण, बीड.
------------
लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊनही प्रमाणपत्र मिळाले नसल्याने अडचण आली. याची माहिती संबंधित केंद्रप्रमुखांना दिल्यानंतर दुसऱ्या डोससाठी विशेष परवानगी घेण्यात आली. दुसरा डोस घेतल्यानंतर पहिल्या डोसची नोंदणी होऊन प्रमाणपत्र मिळाले. - पवन चांडक, माजलगाव.
------------
लसीकरणावेळी घ्या ही काळजी
लसीकरणासाठी नोंद करताना शक्यतो स्वत:चा मोबाईल नंबर द्यावा. स्वत:कडे नसल्यास अगदी जवळच्या नात्यातील नंबर द्यावा. जो नंबर दिला, तो लिहून ठेवावा कारण मोबाईलमध्ये दोन सीमचा वापर होतो. लसीकरणनंतर लगेच प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी. केंद्रावर मिळणारे टोकन ज्यावर लस घेतल्याचा दिनांक व इतर आवश्यक नोंद असते, त्याआधारेही दुसरे लसीकरण करता येऊ शकते.
---------
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५ लाख २२ हजार ७५४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून मिळालेल्या मेसेजनुसार केंद्रस्थळी वेळेवर यावे. न घाबरता लसीकरण करून घ्यावे. तसेच इतरांनाही लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. -- डॉ. शेख रऊफ, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी तथा लसीकरण मोहीम प्रमुख, बीड.
---------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण - ५,२२, ७५४
पहिला - ४,०९,४९३
दोन्ही डोस - १,१३, २६१
---------------
कोविशिल्ड -४, ६१, ४४९
कोवॅक्सिन - ६१,३०५
------------