लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केला होता. त्यानंतर याच सारख्याच क्रमांकाचा दुसरा टेम्पो पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी हा टेम्पो बदलल्याची चर्चा होती. मांसाचा टेम्पो न्यायायालयाच्या आदेशाने सुटला आहे. मात्र, त्याच क्रमांकाचा दुसरा टेम्पो कोणाचा? याचा अद्याप पोलिसांना तपास लागलेला नाही.पोउपनि रामकृष्ण सागडे यांनी खडकत येथे विनापरवाना चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक टेम्पो (एमएच ४२ एक्यू ९८२५) असा १० लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई १ फेबु्रवारी रोजी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात मांस नष्ट करण्यासाठी नेले. यावेळी येथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून टेम्पो बदलण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, ‘लोकमत’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर यंत्रणा हलली आणि सारख्या क्रमांकाचा (एमएच ४२ एक्यू ९८२५) टेम्पो सापडल्याची बनवाबनवी केली. दोन्हीही टेम्पो ठाण्यात लावले. काही दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातील टेम्पो न्यायालयाच्या आदेशाने सोडून देण्यात आला आहे. मात्र, दुसरा टेम्पो अद्यापही ठाण्यात असून त्यावर कसलीच कारवाई झालेली नाही. आष्टी पोलीस पळवाटा काढून हा टेम्पो सोडून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, याप्रकरणात पोउपनि सागडे यांच्या फिर्यादीवरून आमिर बाबूराव शेख, मोहंमद फारूकखान मोहमद खलील, मुजाहिर जब्बार कुरेशी यांच्याविरोधात गन्हा दाखल झालेला आहे. तपास पोना अशोक केदार हे करीत आहेत.
मांसाचा टेम्पो न्यायालयातून सुटला, तर त्याच क्रमांकाचा दुसरा टेम्पो कोणाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:47 AM