कडा : कोरोनाकाळात अनेक डॉक्टर रुग्णांंना चांगले उपचार देत आहेत. परंतु खासगी वैद्यकीय क्षेत्रात काही डॉक्टरांकडून ‘धंदा’ हा शब्द कमी पडेल अशी लूट सुरू आहे. रुग्णांकडून बिलांचे आकडे ऐकले तर आम्हालाही पळून जावे, असे वाटते, अशी खंत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.
आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधीलकीतून कडा येथे अमोलक जैन विद्यालयात आईसाहेब नावाने सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. या हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी आमदार सुरेश धस बोलत होते. कोरोनाकाळात आपण राजकारण करीत नाही. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, डॉक्टर यांनी हातात घालून काम करावे. वैद्यकीय क्षेत्रातील खासगी डॉक्टरांनीही खोऱ्यांनी पैसे ओढण्याची वृत्ती बाजूला ठेवावी. सेवाभाव जपण्याची मानसिकता ठेवावी. ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम डॉ. शरद मोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव आणि विश्वस्तांच्या पुढाकारातून हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यात १०० बेड उपलब्ध राहणार आहे. २० बेड आयसीयू, ३० ऑक्सिजन व ५० आयसोलेशन बेड आहेत. यामुळे आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णांची फरपट थांबणार आहे, असेही धस यावेळी म्हणाले.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद मोहरकर, युवराज पाटील, बाबासाहेब म्हस्के, दादासाहेब ढोबळे, राजेंद्र म्हस्के व कडा ग्रामस्थ उपस्थित होते.
...
मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून मागील वर्षीही कोरोनाकाळात गरजू, गरीब लोकांंना अन्नधान्य, सॅनिटायझर्सची गावोगावी जाऊन मदतीचा उपक्रम राबविला. यावर्षीही आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या वतीने हे कोविड रुग्णालयात उभारले आहे. ट्रस्टला येणाऱ्या मदतीतून हे रुग्णालयात चालविण्यात येत आहे, हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरेल.
- दादासाहेब चितळे, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट, अध्यक्ष, सावरगाव, ता. आष्टी