अंबाजोगाई : कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला.बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह नेते उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले, अपघातापेक्षा यू टर्न घेत जे निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतात त्या शरद पवारांना आता पक्षाकडे कोणतंच काम राहिले नसल्याने ही निवडणूक जातीकडे नेत आहेत. अशा भूलथापांना लोक थारा देत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. जातीधर्माच्या नव्हे तर विकासावर मत मागा असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना पंधरा वर्ष सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. त्यांना आपण स्वत: आरक्षण दिले. बीड जिल्ह्यात १५ वर्षात केवळ ४०० कोटी रुपये आघाडी सरकारने दिले होते. तर माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळत ३७०० कोटी रुपये देण्यात आले.मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा आहे. आजपर्यंत ताठ कणा असणारा पंतप्रधान नव्हता. जशास तसे ठोस उत्तर देऊन पाकिस्तानला नमविण्याची कामगिरी त्यांनी केली. मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून सामान्य माणूस विकासाच्या प्रवाहात आल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला गोपीनाथराव मुंडे यांनी नवी दिशा दिली. त्यांचा वारसा पंकजा व प्रीतम समर्थपणे चालवत आहेत. गोपीनाथरावाचं नाव लावण्याचा खरा अधिकार या दोघींनाच आहे. विनाकारण त्यांचं नाव लावण्यावरून राजकारण सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडयाचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्वतंत्र वॉटरग्रीड तयार करून गोदावरीचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळवून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, अभिनय व भाषणे यांचे क्लासेस आमच्या भावाने घ्यावेत. एवढंच काम त्यांना आता शिल्लक आहे. धोकेबाजांसाठी जर आॅलिम्पिक स्पर्धा निघाली तर ते निश्चित पहिले येतील. ज्यांना काटा लावताना शेतकरी दिसत नाही त्यांना शेतकऱ्यांचा पुळका आल्याची टीका सोनवणे यांच्यावर केली.जयदत्त अण्णा तुम्ही तिकडे शोभून दिसत नव्हता - मुख्यमंत्रीजयदत्तअण्णा, तुमच्यासारखा माणूस तिकडे शोभून दिसत नव्हता. बिभीषणासारखी तुमची गत झाली होती. इकडे आलात आता कायमचे राहा, असा सल्ला त्यांनी क्षीरसागरांना दिला.मेटे, तुमची भूमिका बदला - रामदास आठवलेयावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पोलादी विकास पुरुष आहेत. त्यांच्या कार्यामुळे माझा पक्ष त्यांच्या सोबत आहे. समाजात फूट पाडण्याचे काम काही लोक करीत आहेत. संविधान बदलाचा विषय सोडून इतर विषयांवर टीका करा. मी भाजपसोबत असलो तरी कधीही संविधान बदलू देणार नाही.यावेळी रामदास आठवले म्हणाले की, विनायक मेटे हे माझे मित्र आहेत. ‘फडणवीस करणार तुम्हाला मोठे, मग असं का वागतात मेटे?’ जरी गेलात तरी परत या तुमची विधान परिषदेची व मंत्रिपदाची अपेक्षा भाजपाशिवाय पूर्ण होणार नाही. यासाठी त्यांनी आपली भूमिका बदलावी. अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली, तर आ. जयदत्त क्षीरसागर यांची व्यासपीठावरील उपस्थिती लक्षात घेत आठवले यांनी ‘जिन्होंने पलट दिया राष्ट्रवादी का पन्ना त्यांचं नाव आहे जयदत्तअण्णा’ अशी शीघ्र चारोळी सादर करीत श्रोत्यांचे मनोरंजन केले.
राहायचं असेल तर मुंडेंसोबत, अन्यथा गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:21 AM
कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा मेटेंना सबुरीचा सल्ला : अंबाजोगाई येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर केली टीका; जातीधर्मावर नव्हे, तर विकासावर मत मागा