विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शहरी व ग्रामीण भागाला मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू झाल्याने पिकांना पाणी देणे सुरू आहे. शहरी भागात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक खंदारे यांनी केली आहे.
अंबाजोगाई शहरात पदपथावर आक्रमण
अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथ सोडण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी
केज : शहरासह तालुक्यात सध्या अवैध व्यवसाय बोकाळले आहेत. आतातर मटक्याला विविध नावे दिली जात आहेत. या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील अवैध धंदे तत्काळ बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.