रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. समोरून वाहन गेल्यास समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत आहे.
अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थींना अन्न पुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही. पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.
अंबाजोगाईतील मंडी बाजारात अस्वच्छता
अंबाजोगाई : शहरातील मंडीबाजार परिसरात दररोज भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. व्यावसायिक लोक खराब भाजीपाला रस्त्यावर टाकत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. परिसरात स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी, बाजारकरूंमधून केली जात आहे.
गुटखा, दारू विक्री; नियंत्रणाची मागणी
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून व्यसनाधीनतेमुळे कुटुंबातील कलह वाढत चालले आहेत.
पारदर्शक पाइप बसवा
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का? हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाइप पारदर्शक असावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
स्थानकात अस्वच्छता
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.