माजलगाव : शहरात जागोजागी नियमबाह्य व विनापरवाना बांधकामांचा सपाटा सुरू असताना व याबाबत नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शहरात जवळपास १४ हजार घरे बांधलेली आहेत. त्यापैकी ७ हजार घरांची नगरपालिकेकडे नोंदच नव्हती. एक वर्षापूर्वी नगरपालिकेने एका कंपनीमार्फत सर्वेक्षण करून घेतल्यानंतर ही बाब उघड झाली. त्यानंतरही सध्या शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना घरे, कॉम्प्लेक्सची बांधकामे सुरू आहेत. याकडे नगरपालिका प्रशासन कानाडोळा करतांना दिसत आहे. शहरातील बायपासवर सर्व्हे नंबर ३६८ मधील डॉ. सुशीलकुमार बन्सीधरराव सोळंके यांच्या मालकीचा प्लॉट नंबर १३ व १४ मिळकत क्रमांक २६/१३३७ व २४/१३१५/१ असा असून या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून नियमबाह्य बांधकाम सुरू आहे. संबंधित मालकाने दोन विंग बांधकाम पूर्ण केलेले आहे. हे बांधकाम
गोकुळ अपार्टमेंट फेज २ व फेज ३ पूर्ण झालेले आहे. सध्या फेज १ चे बांधकाम सुरू असून हे बांधकाम करत असताना फेज २ व फेज १ मध्ये कसलेच अंतर ठेवण्यात आले नाही. संबंधित जागा मालकाने दोन फेजमध्ये कणभरही अंतर न ठेवल्याने गोकुळ अपार्टमेंट फेज २ मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात अंधार पडला आहे. त्यांचे हवा, पाणीदेखील बंद झाले आहे. याबाबत मागील एक-दीड महिन्यात जिल्हाधिकारी, नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार केली. परंतु नगरपालिकेने याकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप गोकुळ अपार्टमेंट फेज २ मधील रहिवाशांनी केला आहे. या बांधकामामुळे या अपार्टमेंटमधील नागरिकांना त्यांच्या घरातील ड्रेनेज पाईप खराब झालातर तेही काढता येऊ शकणार नसल्याने त्यांची झोप उडाली आहे.
गोकुळ अपार्टमेंट फेज २ ला सपोर्ट म्हणून बांधकाम
गोकुळ अपार्टमेंट फेज १ चे बांधकाम पूर्णपणे नियमानुसार सुरू असून गोकुळ अपार्टमेंट फेज २ ला सपोर्ट म्हणून आम्ही हे बांधकाम चिटकून घेतलेले आहे. मी दोन फूट जागा सोडायला तयार होतो. परंतु बाजूच्या नागरिकांनी ४ फूट जागा सोडण्याचा आग्रह केला होता.
--डॉ. सुशीलकुमार सोळंके, जागा मालक
या प्रकरणी डॉ. सोळंके यांना नोटीस पाठवली असता, त्यांनी कामावर हस्तक्षेप घेण्यास कोर्टाची स्थगिती असल्याचे कळविले. त्यानुसार कायदेशीर सल्लागार व तांत्रिक बाबींसाठी वरिष्ठ कार्यालयांशी पत्रव्यवहार करून पुढील संभाव्य कार्यवाहीची चाचपणी सुरू आहे.
--अशिष तुसे, अभियंता नगररचना विभाग, नपा, माजलगाव