नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊन देखील दुर्लक्ष होत आहे.
दुभाजकामधील झाडे बहरली
बीड : शहरातील दुभाजकांच्या मध्ये नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. पाऊस व पाणी दिल्यामुळे ती चांगलीच बहरली असून, शहर सुशोभित दिसू लागले आहे. या झाडांना नियमित पाणी दिले जात असल्याने वाढ चांगली होत आहे. यामुळे रस्त्यावरून जाताना रस्ते सुशोभित दिसत आहेत.
बोंडअळीमुळे शेतकरी संकटात
अंबाजोगाई : तालुक्यात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले. आता कापूस बहरात आला होता, तर कापसावर बऱ्याच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.