अविनाश कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यात काही ठिकाणी वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू आहे. यातून शासनाच्या मालमत्तेची लूट होत असून, कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असताना महसूल विभाग व पोलीस विभाग याकडे कानाडोळा करत आहेत. खडकत, सांगवीआष्टी, कडा हद्दीतून जाणाऱ्या सिना, कडी, बोकडी नदीपात्रात वाळू तस्करांकडून रात्रीच्या वेळी जेसीबी मशीनद्वारे सर्रास वाळू तस्करी सुरू आहे. तालुक्यातील काही नद्यांतील वाळू काढून तिचा साठा करून ठेवल्यानंतर अव्वाच्या सव्वा दराने विक्रीही केली जात आहे. कडा, देवी निमगाव, खडकत, शिराळ, वाकी परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू जमा झाली. परंतु, मागील काही दिवसांपासून या नदीपात्रातून वाळूचा उपसा झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पाणीसाठा खालावत आहे. वाळू तस्कर नदीतून रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने सर्रास वाळू उपसा करत आहेत. स्थानिक हद्दीतील तलाठी व मंडल अधिकारीही याविषयी मौन बाळगून आहेत. तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा, धामणगाव, दौलावडगाव, पिंपळा, शिराळ या सात मंडलांमध्ये महसूलचे पथक नियुक्त केले आहे. परंतु, या पथकाने किती व कोणती कारवाई केली, हा संशोधनाचा विषय आहे.
वाळूअभावी घरकुलांची कामे खोळंबली
शासनाने गरिबांसाठी घरकुल योजना आणली. सध्या एक ब्रास वाळू घेण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. या दराने वाळू घेणे परवडत नसल्याने घरकुलांचे काम अनेक ठिकाणी अर्धवट झाल्याचे पाहायला मिळते.
पथक नेमले, कारवाई सुरू
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचे पथक नायब तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली नेमले आहे. हे पथक दररोज रात्रीच्या वेळी फिरते. दोन दिवसांपूर्वी कडी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर नांदा, चोभानिमगाव, टाकळसिंग परिसरातील अवैध ७० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
- राजाभाऊ कदम, तहसीलदार, आष्टी