अंमळनेर येथे गर्भवती मातांची तपासणी
बीड : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत महिन्याच्या प्रत्येक ९ तारखेला गर्भवती मातांची स्त्री राेग तज्ज्ञांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात येते. औषधोपचार करून त्यांना मार्गदर्शनही केले जाते. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी गर्भवतींची तपासणी झाली. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे उपस्थित होते.
चोऱ्या वाढल्याने गस्तीची गरज
वडवणी : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाईप, वायर अशा कंपाऊंडमधील वस्तूंच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. तालुका व शहर परिसरातील विविध भागात साहित्याच्या चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
शिरूर कासार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. समोरून एखादे वाहन गेल्यास दुचाकी चालकांना समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत आहे.
शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा
बीड : कोरोनामुळे शेतकरी, शेतमजूर यांचे नुकसान झालेले आहे. अशातच सक्तीची वीजबिल वसुली सुरू आहे. ही वसुली थांबवावी व वीजबिल माफी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी शिव संग्रामचे राजेंद्र आमटे, गोपीनाथ घुमरे, बाजार समिती संचालक, गणेश साबळे, विलास मोरे, विष्णू कणके, प्रशांत थोरात, कचरू कदम आदी उपस्थित होते.