(फोटो )
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : एक लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई : राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने अंबाजोगाई तालुक्यात चनई तांडा परिसरात २३ डिसेंबर रोजी धाड टाकून केलेल्या कारवाईत १ लाख १ हजार २०० रुपये किमतीचा अवैधरीत्या गावठी मद्यनिर्मितीचा मुद्देमाल जप्त करून ३ गुन्हे दाखल केल्याची माहिती प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी, केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आहे. त्यानिमित्त आदर्श आचारसंहिता सुरू आहे, तसेच ३१ डिसेंबर ही वर्षपूर्ती व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईअंतर्गत अंबाजोगाई तालुक्यात चनई तांडा व परिसरात गस्तीवर असताना केलेल्या कारवाईत एकूण ३ गुन्हे नोंदवले आहेत. टाकलेल्या धाडीत ४६०० लिटर रसायन, २०० लिटरचे २३ बॅरल असा एकूण १ लाख १२०० रुपये किमतीच्या मुद्देमालाचा समावेश आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी केलेल्या या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड, दुय्यम निरीक्षक ए.एन. पिकले, जवान बी.के. पाटील, जवान तसेच वाहनचालक के.एन. डुकरे यांनी केली.
वर्षभरात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड यांनी सन २०१८ ते सन २०१९ या कालावधीत अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर, अवैध मद्यनिर्मितीविरुद्ध अनेकदा कारवाई करीत तब्बल ३५ लाख रुपयांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला. तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल केले.