Russia-Ukraine War:युध्दामुळे तेल भडकले;सोयाबीन व सोयातेलात एका दिवसांत १ हजारांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 06:30 PM2022-02-24T18:30:59+5:302022-02-24T18:32:32+5:30
या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे
-पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड ) : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात होताचा चार महिन्यांपासून स्थिर असलेल्या सोयाबीन व सोयाबीन तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. एका दिवसांत क्विंटल मागे एक हजार रुपयांनी वाढ झाली. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव ऑगस्ट महिन्यात 10 हजारांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे यावर्षी देखील सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु सोयाबीनचे भाव मागील तीन महिन्यात साडेसहा हजाराच्या पुढे गेले नाहीत. उलट सोयाबीनचे भाव कमी होतील असे वाटत असताना रशिया व युक्रेन यांच्यात गुरुवारी युध्दाला सुरुवात होताच सोयाबीन आणि सोयाबीन तेलाचे भाव अचानक वाढले. बुधवारी सोयाबीन तेल 151 रुपये किलो होते तेल गुरुवारी दुपारी 161 रुपये झाले. तर सोयाबीनचा भाव बुधवार रोजी 6 हजार 500 रुपये होता. तेच सोयाबीन गुरुवारी सकाळी 7 हजार 100 रुपये होते ते दुपारी 7 हजार 500 रुपये झाले.
बुधवार गुरूवार
सोयाबीन तेल 151 161
पामतेल 147 154
सुर्यफुल तेल 162 168
शेंगदाणा तेल 170 175
अचानक वाढ झाली
यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी असल्यामुळे व गुरुवारी युद्ध सुरू झाल्यामुळे सोयाबीनच्या भावात अचानक वाढ झाली. युद्ध असेच सुरू राहिल्यास सोयाबीन भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- पवन चांडक ,आडत व्यापारी
आणखी वाढ होण्याची शक्यता
रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे सोयाबीन व सोयाबीन तेलात बुधवार पेक्षा गुरुवारी मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. तेलाच्या भावात आणखीन वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- आश्विन राठोड , तेलाचे व्यापारी