परळी (जि. बीड) : येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राला सध्या ओल्या कोळशाचा पुरवठा आहे. यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. सध्या केंद्रातील तीन संच चालू आहेत. परळी केंद्रातील तीन संचातून शुक्रवारी एकूण ५८० मेगावॉट विजेचे उत्पादन चालू होते. वीजनिर्मिती कंपनीच्या नवीन परळी केंद्रात २५० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक ६, ७ व ८ हे तीन संच आहेत. या तीन संचाची एकूण स्थापित क्षमता ७५० मेगावॉट आहे. सध्या वीजनिर्मितीसाठी ओला कोळशाचा पुरवठा होत आहे, तरीही तीनही संच सुरू आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती सातत्याने होत आहे. शुक्रवारी दुपारी तीन संचातून ५८० मेगावॉट एवढी वीजनिर्मिती चालू असून, ओल्या कोळशाचा पुरवठा बंद होऊन चांगला कोळसा आल्यास वीजनिर्मितीत वाढ होईल. ६७५ मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची तयारी नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. आंध्र प्रदेशातील एससीसीएलकडून रेल्वेने या केंद्रास कोळशाचा पुरवठा होतो.
Electricity: ओल्या कोळशामुळे वीजनिर्मितीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 8:47 AM