अंबाजोगाई (बीड ) : शहरात वेगवेगळ्या गरिबांच्या वस्त्यांमध्ये विविध ग्रामीण भागातून आलेले शेतमजूर यांना अन्न सुरक्षा योजना लागू करून जॉब कार्डचे वाटप करावे मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर हालगीनाद मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मोर्चेकऱ्यांनी काही काळ धरणे आंदोलनही केले. अन्नसुरक्षा योजना लागू करा व जॉबकार्डचे वाटप करा या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले.
अंबाजोगाई शहरात वेगवेगळ्या गरिबांच्या वस्त्यांमध्ये विविध ग्रामिण भागातून आलेले शेतमजूर आहेत.त्यांना वर्षाकाठी शेतीचे काम व रोजगार अवघ्या तीस दिवसांसाठी मिळतो. तसेच बांधकाम व इतर मजुरीचे दिवस केवळ वीस असे मिळून वर्षाकाठी पन्नास दिवस मजुरी मिळते.बाकी शहरी झोपडपट्ट्यांतील मजुरांना उपासमार सहन करावी लागते.ही वस्तुस्थिती आहे म्हणून यांना सरसकट अन्नसुरक्षा योजना लागू करा व रोजगार हमीची कामे मिळण्याच्या दृष्टीने यांचा सर्वे करून जॉब कार्ड मिळण्याची व्यवस्था करा.17 सप्टेंबर रोजी मा.अपर जिल्हाधिकारी यांनी झेंडावंदन झाल्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाला या दोन्ही प्रश्नांबाबत सोडवणूक करण्यात येईल असे आश्वासित केले आहे.
आजच्या मोर्चा आणि निदर्शनाच्या आंदोलनाच्या मार्फत आपणास आम्ही 20 दिवसाची मुदत देत आहोत.या दरम्यान आपल्या यंत्रणेमार्फत कुटुंबाचा सर्व्हे करण्यात यावा व त्या-त्या तलाठी आणि ग्रामसेवकांना सूचना देण्यात याव्यात जर 20 दिवसांनंतरही महसूल प्रशासनाने प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली नाही. तर आम्हाला नाईलाजाने अतिउग्र असे आंदोलन करावे लागेल असा इशारा कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे यांनी सदरील निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे,कॉ.भागवत जाधव,विशाल पोटभरे,कॉ.मोबिन, भारत देवकर,सुभाष वेडे,शेख इक्बाल,शेख अलीम,भागवत जगताप,विठ्ठल टाकसाळ,आशाबाई जोगदंड,मीरा जोगदंड, जयश्री जोगदंड,रंजना जोगदंड,छाया तरकसे, विजयालक्ष्मी पाचपुते, वैशाली मस्के,ञिशैला शिंदे,पंचशीला कांबळे, अलका जोगदंड,मिरा पाचपिंडे,कविता कांबळे,दिपमाला सरवदे,उज्ज्वला आजले यांच्यासहित इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रणहालगी वाजवत सदर बाजार-शिवाजी चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून काढण्यात आलेल्या आजच्या मोर्चात शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष, शेतमजूर सहभागी झाले होते.
अतिउग्र आंदोलन करणार2013 पासून अन्नसुरक्षा व जॉबकार्ड मुद्यांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी लढा देत आहे. यापुर्वीही आमच्या आंदोलनाने 93 कुटूंबांना रेशनकार्ड मिळाले. उपजिल्हाधिका-यां सोबत चर्चा झाली. रेशनकार्ड व जॉबकार्ड नसणा-या 479 कुटूंबांची यादी सुपुर्द केली. प्रशासनास 20 दिवसांची मुदत दिली आहे. याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्यास आम्हाला नाईलाजाने व्यापक व अतिउग्र असे आंदोलन करावे लागेल.- कॉ. बब्रुवाहन पोटभरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी.