- नितीन कांबळे कडा (बीड) : पॅरेलवर बाहेर आल्यानंतर पसार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याच्या महिनाभरानंतर आष्टी पोलिसांनी सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. सचिन सूर्यवंशी असे या कैद्याचे नाव आहे. रविंद्र उर्फ बाळासाहेब खाकाळ खून प्रकरणी सूर्यवंशीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील सचिन सूर्यवंशी हा तालुक्यातील खाकाळवाडी येथील रविंद्र उर्फ बाळासाहेब खाकाळ खूनप्रकरणी औरंगाबाद येथील हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वी सूर्यवंशी पॅरेलवर बाहेर आला होता. मात्र, मुदत संपल्यानंतर तो परत जेलमध्ये गेला नाही. यामुळे आष्टी पोलिस ठाण्यात महिनाभरापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या कोंबिग ऑपरेशन दरम्यान सूर्यवंशी पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. तेव्हापासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत राहिला. दरम्यान, सोमवारी रात्री खबऱ्याद्वारे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांना सूर्यवंशी बद्दल माहिती मिळाली. यावरून केरूळ येथील राहत्या घरातून पोलिसांनी सूर्यवंशीच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक एन.वाय. धनवडे, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, पोलिस हवालदार विकास राठोड ,पोलिस नाईक संतोष दराडे, पोलिस नाईक सतिष मुंडे, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड यांनी केली.