बीड : चोरी, घरफोडी, दरोडा टाकून दहशत निर्माण करणाऱ्या माजलगावच्या दोन गुंडांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक नदंकुमार ठाकूर यांनी मंगळवारी ही कारवाई केली.
प्रतिक युवराज भोजणे व मिलींद प्रभाकर साळवे (दोघेही रा.केसापुरी कॅम्प ता.माजलगाव) अशी हद्दपार केेलेल्या गुंडांची नावे आहेत. या दोघांनीही माजलगावसह जालना व परभणी जिल्ह्यात चोरी, घरफोडी, दरोडा, लोकांना मारहाण करूण जखमी करणे असे गुन्हे केले होते. या दोघांनी इतरांच्या मदतीने हे गुन्हे केले होते. त्यामुळे या दोन्ही गुंडांची परिसरात दहशत होती. हाच धागा पकडून माजलगाव पोलिसांनी या दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे पाठविला. त्यांनी यावर तात्काळ कारवाई करत या दोघांनाही बीड जिल्ह्यासह जालना जिल्ह्यातील घनसावंगी व परतूर आणि परभणी जिल्ह्यातील पाथरी व सोनपेठ तालुक्यांमधून हद्दपार केले.
ही कारवाई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक पंकज कुमावत, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संतोष साबळे, माजलगावचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहायक निरीक्षक निलेश विधाटे, सहायक फौजदार मोहन क्षीरसागर, अंमलदार अलीम शेख आदींनी केली.