बीड : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. गत निवडणुकीत जवळपास सहा बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर तीन ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असले तरी जिल्ह्यातील बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे कडवे आव्हान आहे. पंकजा यांना भाजपमधील पक्षीय नेतृत्वाची या निवडणुकीत साथ मिळणार का? अशीही चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. दरम्यान, जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द भाजप अशाच लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील १० पैकी परळी, केज, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, पाटोदा-शिरुर, कडा, बीड या ९ बाजार समितींची प्रत्येकी १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी सर्वच आमदारांनी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. आज (३ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
बीडमध्ये चुलते-पुतणेबीड बाजार समितीवर आतापर्यंत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर सत्तांतराचे मोठे आव्हान आहे. यासाठी त्यांनी सर्वपक्षीय आघाडी करुन त्यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पाटोदा-शिरुर, कड्यात धस-धोंडे-आजबेआष्टी तालुक्यातील कडा बाजार समितीत तर पाटोदा-शिरुर बाजार समितीवर अनेक वर्षांपासून भाजपचे आमदार सुरेश धस यांचेच वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही धस यांनी बाजार समितीत सत्ता अबाधित ठेवली होती. आष्टीत भाजपमध्ये धस-धोंडे हे दोन गट आहेत. त्यात मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे आहेत. त्यामुळे त्यांचा यावेळी किती प्रभाव पडतो या निवडणुकीत दिसणार आहे.
गेवराईत पंडित-पवारगेवराई बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या अनेक वर्षांपासून ताब्यात राहिली आहे; परंतु येथे सध्या भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना कितपत यश मिळेल यासाठी वाट पाहावी लागणार आहे; परंतु आ. पवार यांनी इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे.
परळीत मुंडे बहीण-भाऊपरळी बाजार समिती दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गटात आहे. येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासमोर सत्तांतराचे मोठे आव्हान राहणार आहे.
माजलगावात राष्ट्रवादी-भाजपमाजलगाव बाजार समिती राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात आहे. मागील निवडणुकीत त्यांना तत्कालीन भाजपचे आमदार आर.टी.देशमुख, मुंबई बाजार समितीचे माजी अध्यक्ष अशोक डक यांनी सोळंके यांच्याशीच युती केली होती. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली होती. परंतु यावेळी सोळंके यांना भाजपचे मोहनराव जगताप व माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या धारुर बाजार समितीत सोळंके गटाचा पराभव झाला. येथे भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.
केजमध्ये आडसकर विरुद्ध आघाडीकेज बाजार समिती अनेक वर्षांपासून भाजपचे रमेश आडसकर यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी उतरण्याची चिन्हे दिसत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बजरंग सोनवणे हे सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत.
अंबाजोगाईत मुंदडा गटाची प्रतिष्ठाअंबाजोगाई बाजार समितीत मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला होता; परंतु यानंतरही भाजपचे नंदकिशोर मुंदडा यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकिशोर मोदी यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले आहेत.
वडवणीत सोळंके गटाला आव्हानवडवणी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाचे वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजपला सत्तांतर घडविण्यासाठी मोठे आव्हान उभे करावे लागणार आहे. त्यांना येथे भाजपचे राजाभाऊ मुंडे यांचे आव्हान राहणार आहे. येथे पंकजा मुंडे यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.
बाजार समितीतील पक्षीय बलाबल (एकूण १०)राष्ट्रवादी -६भाजप-४