बीड : बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडीचे आ. संदीप क्षीरसागर या चुलत भावांमध्ये लढत होत आहे. त्यांना तिसऱ्या आघाडीचे कुंडलिक खांडे आणि अपक्ष अनिल जगताप यांचे आव्हान आहे.
बीडची जागा १९९० पासून महायुतीत शिवसेनेकडे असायची; परंतु यावेळी राज्यातील घडामोडीमुळे समीकरणे बदलली. यावेळी ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच जाईल असे वाटत असताना शेवटच्या दिवशी अजित पवार गटाने डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडूनही आ. संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीबाबत संशय व्यक्त केला जात होता; परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निष्ठावंत राहिलेल्या आ. क्षीरसागर यांनाच पुन्हा संधी दिली. दरम्यान, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. त्यांचा पाठिंबा कोणाला, याकडे लक्ष लागले होते. मंगळवारी त्यांनी आपला पाठिंबा महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांना जाहीर केला.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. याेगेश क्षीरसागर आणि आ. संदीप क्षीरसागर या एकाच कुटुंबातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.- नातेवाइकांची मनधरणीनंतर जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेत डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला.- बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांसह इतरांकडून क्षीरसागर मुक्तीचा नारा दिला जात आहे.- बीड शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज आदी प्रश्नांवर जनता नाराज आहे.