बीड : शासकीय सेवेत असतानाही आपण स्वत:च्या नावे असलेल्या आई हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये रेडिओलॉजीस्ट म्हणून सेवा देत असल्याची नोटीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी डॉ.चंद्रकांत तोंडे यांना बजावली आहे. वास्वतिक पाहता डॉ.तोंडे हे शासकीय सेवेत आणि रेडीओलॉजिस्ट नसून स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. यावरून सीएस कार्यालयातील संबंधित विभागाचे लिपीक आणि अधिकाऱ्यांचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे.
सरकारी सेवेत असतानाही काही डॉक्टर खासगी सेवा देत असल्याचे समोर आले होते. याबाबत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या सर्वांची माहिती मागवली होती. त्याप्रमाणे आयुक्तांना डॉक्टरांची माहिती देऊन बीड जिल्ह्यातील १० रेडिओलॉजिस्टला नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये डॉ.चंद्रकांत तोंडे यांचाही समावेश होता. डॉ.तोंडे यांचे बीडमध्ये आई हॉस्पिटल असून ते स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. परंतू सीएस कार्यालयातील बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना देणाऱ्या विभागातील लिपीकांच्या गलथानपणामुळे या खासगी डॉक्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून सीएस कार्यालयातील विभाग अपडेट नसल्याचे दिसत आहे. या विभागातील कर्मचारी काय झोपेत काम करतात का? असा सवाल खासगी डॉक्टरांमधून उपस्थित होत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना संपर्क केला, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.
यापूर्वीचा माहिती दिली होती मी कोठेच शासकीय सेवेत नाही. असे असतानाही मला नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत मी जिल्हा शल्य चिकित्सक आणि संबंधित विभागाच्या लिपीकाला यापूर्वीच कल्पना दिली होती. त्यानंतरही यात सुधारणा झाली नाही. आता दुपारी जावून मी आणखी सीएसला भेटणार आहे. डॉ.चंदक्रांत तोंडे, आई हॉस्पिटल बीड