बीड : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, विजयी उमेदवारास प्रमाणपत्रही देण्यात आले. परंतु अद्यापही तुतारी या चिन्हावर अनेकांनी चुकून मतदान केल्याची चर्चा जिल्हाभरात आहे. या चर्चांच्या अनुषंगाने बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक थोरात यांनी आपली प्रतिक्रिया देत तुतारीला पडलेले मतदान माझे मित्र, नातेवाइक, समाजाचे असल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी भरभरून मतदान केल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भागोजी थोरात यांना ‘तुतारी’ तर नॅशनलिस्ट काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह दिले गेले होते. थोरात यांना ५४ हजार ७८३ मतदान झाले होते. दरम्यान, बीड शहरातील खंडेश्वरी भागातील रमाई नगर भागातील रहिवासी असलेले अशोक भागुजी थोरात यांचे शिक्षण १० पर्यंत झालेले आहे. थोरात म्हणाले, यापूर्वी लोकसभा निवडणूक लढविलेली आहे. २०१४ मध्ये ३ ते ४ हजार मतदान मिळाले तर २०१९ मध्ये साडेनऊ हजार मतदान मिळाले होते. पूर्वीपासूनच मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आतापर्यंत दहा हजार लोकांना गॅस कनेक्शन मिळवून दिले असून संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा यासाठी काम केले आहे. लोकसभा निवडणूक मला लढवायची नव्हती. परंतु बहुजन महापार्टीच्यावतीने ज्याने अर्ज भरला होता त्याने अर्ज मागे घेतला. त्यामुळे मला निवडणूक लढविण्याचा आदेश पक्षाने दिला. अर्ज भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मामाकडून व्याजाने पैसे घेऊन निवडणूक अर्ज भरला. प्रचारासाठी पाच रिक्षे लावले, त्यावर भोंगा व मशीन विकत घेऊन त्या रिक्षावर लावली. ऊन अधिक असल्याने रिक्षा चालक सावलीला थांबायचे. त्यावेळी तुतारीला मतदान करा ही कॅसेट सुरू राहिल्याने प्रचार अधिक झाला असे थोरात म्हणाले.
मला कुणीही पैसे दिले नाहीतनिवडणूक लढविण्यासाठी मला पैसे दिल्याची चर्चा आहे. परंतु मला कुणीही पैसे दिले नाहीत. त्यामुळे मी आजही खुल्या पद्धतीने फिरत आहे. कुणाकडून पैसे घेतले असते तर मला त्रास दिला गेला असता. प्रचारासाठी माझ्याकडे अधिक पैसे नसल्याने गावागावात जाऊन नातेवाइकांकडे जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. ठिकठिकाणी जाऊन पॉम्प्लेट्स वाटप केले असल्याने अधिक प्रचार झाला असल्याचे अशोक थोरात म्हणाले.
तुतारी बाबत संभ्रम कसा होऊ शकतो ?मतदानासाठी आपण घराबाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांकडून एखाद्या पक्षाला मतदान करण्याचे सांगितले जाते. मतदान केंद्रावर गेल्यावर पोलिंग एजंट नावाची चिठ्ठी देतात. त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या नंबरचे बटन दाबा, असे सांगितले. मतदार विचार करूनच मतदान करतो. ऐवढे सगळे असताना ‘तुतारी वाजविणारा माणूस’ व तुतारी बाबत संभ्रम कसा होऊ शकतो ? मला झालेले ५४ हजार ७८३ मतदान हे माझे मित्र, नातेवाइक, समाजाचे असून त्यांनी प्रेमापोटी भरभरून मतदान केले. मी त्यांचा आभारी असून मतदारासाठी नेहमीच तत्पर असल्याचे अशोक थोरात म्हणाले.