- सोमनाथ खताळबीड: बीडचे भूमिपुत्र तुकाराम मुंढे सध्या राज्याचे आरोग्य आयुक्त आहेत. दिवाळीत घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी सरकारी डॉक्टरांनी खासगी सेवा करू नये, अशा सक्त सूचना दिल्या होत्या; परंतु सेवा तर सोडाच उलट सरकारी डॉक्टरांच्या नावावरच खासगी रुग्णालये सुरू असल्याचे समोर आले आहे. तर काही डॉक्टर पत्नीच्या नावे बॉम्बे नर्सिंग होमची परवानगी घेऊन खासगी सेवा देत आहेत. शिस्तप्रिय असलेल्या आयुक्तांच्या जिल्ह्यातच हा सावळागोंधळ सुरू असल्याने परवानगी देणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांबद्दल संशय व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात ३१३ लोकांना बॉम्बे नर्सिंग होमची परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तर शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सक या परवानगी देत असतात. नियमानुसार सरकारी डॉक्टरांना खासगी सेवा देता येत नाही; परंतु काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आधीन राहून ते भत्ता (एनपीए) न घेता खासगी सेवा देतात. ही सेवादेखील त्यांना ड्यूटीच्या वेळेत देता येत नाही. तरीही काही डॉक्टर न्यायालयाचे आदेश जवळ नसतानाही खासगी सेवा देत आहेत. एवढेच नव्हे तर काहींनी चक्क स्वत:च्या नावावर बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना घेऊन सेवा सुरू केली आहे. याची यादीच 'बीड एनआयसी' या अधिकृत संकेतस्थळावर आहे. त्यामुळे परवानगी देणारे जिल्हा शल्य चिकित्सक अडचणीत येण्याची शक्यता आहे. परवाना देण्याचा टेबल असणारे कर्मचारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यांनी याकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करून या परवानग्या दिल्याचा आरोप सामान्यांमधून केला जात आहे. याची चौकशी करून परवानगी देणाऱ्यांसह घेणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी फोन घेतला नाही तर उपसंचालक डॉ. कमल चामले यांचा फोन लागला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.
पत्नीच्या नावावर असणारे रुग्णालयेकाही डॉक्टर शासकीय सेवेत असल्याने पत्नीच्या नावे बॉम्बे नर्सिंग होमची परवानगी घेतात. यात समजलेल्या माहितीनुसार भाजी मंडईतील एक नेत्रालय, आदर्शनगर भागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याचे नेत्रालय, बार्शी रोडवर जिल्हा रुग्णालयाच्या समोरील रग्णालय, याच रोडवर पुन्हा स्त्री रुग्णालय आहे. येथे सरकारी डॉक्टर सर्रास सेवा देत असल्याचे अनेकदा दिसून आलेले आहे.
स्वत:च्या नावावर असलेली रुग्णालयेसरकारी सेवेत असतानाही काही जणांना बॉम्बे नर्सिंग होमचे परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये जालना रोडवरील काझीनगरमधील ६ बेडचे रुग्णालय, भाग्यनगरमधील ५ खाटांचे अस्थिरोगतज्ज्ञांचे रुग्णालय, डीपी रोडवर आदर्शनगरमधील ५ बेडचे स्त्री रुग्णालय, जालना रोडवरील अस्थिरोगतज्ज्ञांचे रुग्णालय यांचा समावेश आहे. ही सर्व नावे संकेतस्थळावरील यादीतून समोर आली आहेत.
संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्यास आखडता हातबीड एनआयसी या संकेतस्थळावर कोणत्या तालुक्यात कोणाला आणि किती बेडची परवानगी देण्यात आली, त्या सर्व बॉम्बे नर्सिंग होमची यादी नियमित अपलोड करणे आवश्यक आहे; परंतु आपला गलथान कारभार चव्हाट्यावर येण्याच्या भीतीने जिल्हा शल्य चिकित्सक आणि संबंधित लिपिक ही माहिती अपडेट करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात आले. अनेकांचे रुग्णालय नियमानुसार नसतानाही परवानग्या देण्यात आल्या आहेत. हीच बाब लपवून ठेवण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी याकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
तपासणी केली जाईल शासकीय डॉक्टरांना बॉम्बे नर्सिंग होमची परवानगी देण्यात येत नाही; परंतु न्यायालयाची ऑर्डर असल्यास देता येते. काही महिलांच्या नावानेही परवागनी दिलेली आहे. परंतु ते कोण सेवा देणार, त्या डॉक्टरचे नाव देत असतात. त्यामुळे परवानगी दिली जाते. तरीही याची तपासणी केली जाईल.डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
अशी आहे जिल्ह्यातील आकडेवारी (बीड एनआयसीच्या संकेतस्थळावरून)अंबाजोगाई ४२आष्टी ५बीड १३५धारूर २२गेवराई ४०केज १२माजलगाव ५४परळी ४७पाटोदा १३शिरूर ३वडवणी १०