- अनिल महाजनधारूर : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी चे काम करताना धुनकवड पाटी ते धारुर घाटासह शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच बारा किलोमीटर रस्ता अरुंदच ठेवून फक्त वरवर डागडुजी करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून हा रस्ता अरुंदच राहिल्याने धारुर घाटाचे रुंदीकरण रखडल्याने हा अपघात मार्ग झाला आहे. आतापर्यंत ५० जणांचे बळी या रस्त्याने घेतले आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
धारुर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४८-सी हा खामगाव-पंढरपूर पालखी मार्ग गेल्यावर या परिसरातील या मार्गावरील गावांनी खूप आनंद व्यक्त केला; मात्र या रस्त्याचे काम होताना धुनकवड पाटी ते धारुर शहरातील भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक हे बारा किलोमीटर रस्त्याचे काम रुंदीकरण न करता आहे त्या रस्त्यावर फक्त डागडुजी करून हे काम आटोपण्यात आले. आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूने डोंगराचे पायथ्यापासून दोन किलोमीटर रस्ता करण्यात आला. अवघड वळणामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता झाला आहे. धारुर घाटातही तीन किलोमीटरपर्यंत एका बाजूने खोलदरी, अवघड वळणे, खोल दरीच्या बाजूने रोडबरोबर आलेली संरक्षण भिंत यामुळे रस्ता अरुंद बनला आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहन दरीत कोसळणाऱ्या घटना तर नियमित झाल्या आहेत. घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून रोजच लहान, मोठे अपघात होत आहेत. आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त बळी या घाटाने व अवघड वळण रस्त्याने घेतले आहेत. घाटात नेहमीच वाहतूकही ठप्प होते. चार वर्षे होऊनही एमएसआरडीसीचे अधिकारी घाट रुंदीकरणाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत.
धारुर घाट रुंदीकरण तत्काळ कराया रस्त्याने वाहनाची वर्दळ वाढली आहे. धारुर घाट व साठवण तलावाशेजारचा पर्यायी रस्ता अरुंद असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे तत्काळ घाटाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केली आहे.
परवानगी मिळताच काम करूधारुर येथील घाटातील रुंदीकरणासाठीचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळास पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच हे काम तत्काळ सुरू करण्यात येईल, असे एमएसआरडीसीचे उपअभियंता अतुल कोटेचा यांनी सांगीतले.
पोलिसांचा देखील पाठपुरावा सुरु धारुर घाटात वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघात होत आहेत. यामुळे वाहनांची कोंडी होत आहे. यामुळे पोलिसांनाही सतत याकडे लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तत्काळ रुंदीकरण करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे धारुरचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. अटोळे यांनी सांगितले.