- मधुकर सिरसटकेज : सर्वांच्या नजरा लागलेल्या केज राखीव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज दिली. परंतु ही झुंज अखेर अपयशी ठरली असून, अवघ्या २ हजार ६८७ मतांनी नमिता मुंदडा तरल्या आहेत. मुंदडा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता केज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली.
पहिल्या फेरीत सलामीलाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांना २४८ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर नमिता मुंदडा दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत एक हजार ६०४ मतांनी आघाडीवर राहिल्या. चौथी फेरी ते सातव्या, अशा चार फेऱ्यांत साठे ४१० मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर आठव्या फेरीपासून शेवटच्या तिसाव्या फेरी अखेरपर्यंत साठे आणि मुंदडा यांच्यात कडवी झुंज दिसून आली. शेवटी २ हजार ६८७ मतांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी जाहीर केले. निवडणूक निरीक्षक सुनील अंचीपाक्का यांच्या हस्ते नमिता मुंदडा यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
विजयी उमेदवार : आ. नमिता अक्षय मुंदडा (भाजपा): मिळालेली मते -- १,१७,०८१पराभूत उमेदवार : पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट): मिळालेली मते -- १,१४,३९४
विजयाची कारणे१) आमदार नमिता मुंदडा यांनी पाच वर्षांत केज मतदारसंघात केलेली तीन हजार कोटी रुपयांची विकासकामे.२) रमेश आडसकरांनी उमेदवारी मिळणार, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. परंतु त्यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. त्यामुळे आडसकर समर्थक नाराज होते. त्याचा फायदा झाला.३) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व वयोश्री योजनेचा लाभ मतदारसंघातील लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी केलेले प्रयत्न.
साठेंच्या पराभवाची कारणे१) लोकसभेची पुनरावृत्ती होईल, या आशेने मुंदडांच्या शक्तीवर मोठे झालेल्या नेत्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिल्याचा उलट परिणाम झाला.२) भाजपा महायुतीच्या उमेदवाराएवढी तगडी प्रचार यंत्रणा राबविण्यात अपयश, सर्वांचा पाठिंबा या भ्रमामुळे सर्व जण हवेत राहिले.३) माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर इतरांना डावलून त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी केलेली निवड अंगलट आली.
माझा विजय हा मतदारांचा विजयकेज विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांना मतदारांनी दिलेला हा कौल आहे. जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवून मतदारसंघात विकासाची कामे करणार आहे. मला मिळालेले प्रत्येक मत हे लाखमोलाचे आहे. त्यामुळे माझा विजय मी मतदारांना समर्पित करते. मुंदडा कुटुंब व मतदार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जो ऋणानुबंध आहे तो कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील. जी विकासकामे माझ्याकडून राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.-नमिता मुंदडा, भाजप