बीड : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. याला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने घेण्यात आला होता. सोमवारी यासाठी शासकीय विश्रामगृह येथे बैठकही झाली होती. सुरूवातीला याची तारीख ६ सप्टेंबर निश्चीत झाली होती. परंतू या दिवशी तलाठी व इतर परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एक दिवस पुढे म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संयोजकांनी ही माहिती मंगळवारी दिली.
चक्काजाम आंदोलनाची वेळी पाळावयाची आचार संहिता(१) चक्काजाम आंदोलन दि.०७-०९-२०२३ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान होईल. आंदोलनाच्या पूर्वी प्रमुख मराठा बांधवांनी चक्काजाम आंदोलनाचे ठिकाण निवडून त्याची माहिती आपल्या विभागातील पोलीस प्रशासनास द्यावी.२) चक्काजाम आंदोलनाच्या वेळी प्रमुख मराठा कार्यकत्यांनी चक्काजाम आंदोलन लोकशाही पद्धतीने व शांततेने होईल, यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे.३) चक्काजाम आंदोलनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्व मराठा बांधवांनी दक्षता घ्यावी.४) चक्काजाम आंदोलनाच्या वेळी अत्यावश्यक सेवेची वाहने, जसे की, रूग्णवाहिका, अग्नीशामक दल, पोलीस प्रशासनाच्या गाड्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. ५) चक्काजाम आंदोलनाच्या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, दगडफेक / जाळपोळ होणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या जिवीतास धोका निर्माण होईल, असे वर्तन आंदोलकांच्या वतीने होणार नाही, याची दक्षता घ्यावी.६) चक्काजाम आंदोलनाच्या दरम्यान, कोणीही आंदोलनात व्यसन करून सहभागी दरम्यान: होणार नाही, याची दक्षता घ्यावी.७) चक्काजाम आंदोलन निर्धारीत वेळेत पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी.८) चक्काजाम आंदोलनाच्या वेळी प्रमुख मराठा बांधवांनी आंदोलकांसाठी एक रुग्णवाहिका वैद्यकिय अधिकाऱ्यासह सोबत ठेवावी.९) चक्काजाम आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने होईल.