बीड : जिल्ह्यातील ८ लाख कामगार राज्यासह परराज्यात ऊसतोडणीला जातात. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत २२० हंगामी वसतिगृह सुरू केली. यात २१ हजार ४९० मुले असल्याचा दावा बीडचा शिक्षण विभाग करत आहे. परंतु कोल्हापूरच्या 'अवनी' संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांवर जाऊन सर्वेक्षण केले. तर ० ते १८ वयोगटातील तब्बल १८३९ मुले, मुली हे अंगणवाडी, शाळा सोडून उसाच्या फडात असल्याचे समोर आले आहे.
राज्यात १९१ साखर कारखाने आहेत. त्यातील ३५ कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. यातीलच ११ कारखान्यांचे सर्वेक्षण अवनी संस्थेने केले. यात जे शाळाबाह्य मुले आढळली त्यांची यादी त्यांनी बीडच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांना पाठवली. आता त्यांच्याकडून उलट तपासणी केली जात आहे. परंतु या निमित्ताने शिक्षण विभागाचा दावा फोल ठरला आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अजूनही पूर्णपणे यशस्वी झाला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील ११ कारखान्यांवर १८३९ मुले आढळली आहेत. जर राज्यातील सर्वच कारखान्यांची माहिती घेतली तर हा आकडा फुगण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शिक्षण विभागाचा दावाही उघड होऊ शकतो.
२१ हजार मुलांचे स्थलांतर रोखले?जिल्हा परिषद विभागाने समग्र शिक्षाअंतर्गत जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या २१ हजार ४९० मुलांचे स्थलांतर रोखले आहे. यामध्ये १० हजार ८८४ मुले आणि १० हजार ५६० मुलींचा समावेश आहे. त्यांच्यासाठी हंगामी वसतिगृहही सुरू करत त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. प्रत्यक्षात मात्र, अजूनही कामगारांची मुले उसाच्या फडातच आहेत.
बीडचे ऊसतोड कामगार जातात कोठे?जिल्ह्यातून साधारण ८ लाख कामगार हे ऊसताेडीसाठी राज्यातील १९१ कारखान्यांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत जातात. सोबतच शेजारील जिल्ह्यातील ४ लाख कामगार हे ऊसताेडीसाठी जातात. सर्वात जास्त कामगार हे सांगली, सातारा, कोल्हापूर याच जिल्ह्यांमध्ये जात असल्याचे सांगण्यात आले.
फडात आणि शाळेत दोन्ही नोंदीकोल्हापूर जिल्ह्यातील ३५ पैकी ११ कारखान्यांवर जाऊन अवनी संस्थेने माहिती घेतली. त्यात १८३९ मुले हे पालकांसोबत होती. याची माहिती आमच्या संस्थेला पाठवली असून आता त्याची उलट तपासणी करत आहोत. काही ठिकाणी हेच विद्यार्थी शाळेत हजर आहेत. हाच प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत.- तत्त्वशील कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड
माहिती घेऊन सांगतो मी नवीन आहे. हंगामी वसतिगृह आणि मुलांची यादी मागवून घेत अभ्यास करतो. उद्या तुम्हाला याची माहिती देतो.- भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बीड
अवनी संस्थेने काय केले ?कारखान्यांना भेटी - ११कुटुंब संख्या - १९५८एकूण मुले - १८३९
किती मुले आढळली?० ते ३ वयोगट - ३३५४ ते ६ वयोगट - ३५३७ ते १४ वयोगट - ६५३१५ ते १८ वयोगट - ४९८