पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवरचा वचक संपल्याची परिस्थिती
केज : तालुक्यात मागील दीड-दोन वर्षांपासून घडणाऱ्या गुन्ह्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येवरून दिसून येत आहे. सध्या शहर व ग्रामीण भागात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर अपेक्षित असणारा पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही. परिणामी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कडक आदेश देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यात घट होणे गरजेचे होते. मात्र, उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी केज पोलीस उपअधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या केज, युसुफवडगाव व धारूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. शहरात व ग्रामीण भागात अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांकडे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडे पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याने घडणाऱ्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. सध्या पोलीस ठाण्याजवळ व शहरातील मुख्य रस्त्यालगत तर ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, मटका व पत्त्यांचे जुगार अड्डे सर्वत्र सुरू आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तरूण त्याच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत. याचा परिणाम म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे. दररोज महिला अत्याचार, विनयभंग, मारहाण, मुलींची छेड व पळवून नेण्याचा घटनांसह चोरी, खून व वाटमारी यांसारख्या घटनेत वाढ झाली आहे. यावरून पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवरचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत जाऊन महिलांसह जनतेची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन संबंधीत पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. अवैध धंदे बंद करा. तालुक्यासह केज शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोरात चालू आहेत. मटक्याच्या बुक्या शहरात ठिकठिकाणी चालू असल्याने तालुक्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. शहरातील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करावेत अन्यथा अवैध धंदे बंद करण्यासाठी शेकाप रस्त्यावर उतरेल, असा इशारा पक्षाचे मध्यवर्ती सदस्य भाई मोहन गुंड यांनी दिला आहे. केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत. मात्र, याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांचे संसार मोडण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अवैध धंदे बंद न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांनी दिला आहे.