लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हमीदराने खरेदीसाठी नाफेडच्या वतीने सुरु केलेले केंद्र १२ जानेवारी रोजी बंद झाली आहे. मागील दोन आठवड्यात बाजारात तेजीमुळे सोयाबीन उत्पादकांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
३१ डिसेंबर रोजी शासनाच्या हमीकेंद्रावर उडीदाची खरेदी बंद झाली. तर सोयाबीन व मुगाची खरेदी सुरु होती. दुसरीकडे शेतकरी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र कधी सुरु होईल याची प्रतीक्षा करत आहेत. शासनाकडून सोयबीनला दिलेला हमीदर पाहता काही दिवस खुल्या बाजारात शांतता होती. परंतु सोयाप्लान्ट, सोयामील व उपपदार्थ बनविणा-या उत्पादकांकडून मागणी सुरु झाल्याने सोयाबीनच्या दरात तेजीचे वारे सुरु झाले.
परळीच्या बाजारात सोयाबीनची रोज ३ हजार कट्टे (१५०० क्विंटल) आवक होत आहे. सरत्या आठवड्यात भाव ३१७० रुपये क्विंटल होते. तर तुुरीची रोज १५०० कट्टे (७५० क्विंटल) आवक होत आहे. किमान भाव ४ हजार तर कमाल भाव ४१५० रुपये क्विंटल होते.
बीडच्या बाजारात सोयाबीनची आवक रोज शंभर क्विंटल होती. भाव ३१०० रुपये क्विंटलपर्यंत होते. तुरीची आवक दररोज ५०० क्विंटल होत असून भाव ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत होते.
दोन महिन्याआधी सोयाबीनचे भाव २४०० ते २६०० रुपये होते. नंतर तेजी आली. उत्पादनात घट व आवक कमी असल्याने महिन्याभरापासून क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपये तेजी आल्याचे आडत व्यापारी महावीर कोटेचा यांनी सांगितले. बीडच्या बाजारात उडीदमध्ये मंदी असून भाव ३७०० ते ३८०० रुपये क्विंटल होते असे आडत व्यापारी विष्णूदास बियाणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.