परळी : शहरात शासकीय स्तरावर फक्त उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होत असून वाढत्या संख्येमुळे लसीकरणावर मर्यादा येत आहेत. वाढणाऱ्या गर्दीमुळे सामाजिक सुरक्षित अंतर ठेवण्यातसुद्धा अपयश येत असल्याने शहरात आणखी दोन ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. या संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात यापुर्वीच झाली असून ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा १ एप्रिलपासून सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी परळी शहरात विक्रमी ३८१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात खाजगी डॉक्टरांकडे लसीकरणाची सुविधा उपलब्ध असली तरी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील गणेशपार भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व औष्णिक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहत येथे असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलालाल बियाणी यांनी केले आहे.
एकापेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण सुविधा असेल तर आरोग्य यंत्रणेवरही अधिकचा ताण पडणार नाही. तसेच नागरिकांच्या गर्दीतून कोरोनाचा प्रसारही होणार नाही याकडेही बियाणी यांनी लक्ष वेधले आहे. शहरात या दोन्ही ठिकाणी आवश्यक असलेली यंत्रणा तातडीने कार्यान्वित करुन नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.