वीजपुरवठा वारंवार खंडित
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे ‘महावितरण’च्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. वीज चोरांवर कारवाई होत नसल्याने ‘महावितरण’ला भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सीसीटीव्हीची मागणी
गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दिवस-रात्र वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी होत आहे.
गस्त वाढवा
वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
वृक्षतोड थांबवा
पाटोदा : तालुक्यातील अनेक भागांमधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील चक्रधरनगर, शिंदेनगर भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी आहे.
उन्हाळी पिकांसाठी सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
माजलगाव : सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने उन्हाळी पिके घेणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी वीज पंपाचे थकीत वीज बिलांचा भरणा केलेला असला तरी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे कृषीपंप सुरू होत नसून पाणी असून पिकांना देता येत नसल्याची स्थिती आहे.
शिवभोजनसोबत बुंदीचे लाडू
धारूर : येथील शिवभोजन केंद्राचा पहिला वर्धापन दिन लाभार्थ्यांच्या भोजनथाळीत मोतीचूर लाडू देऊन साजरा करण्यात आला. गतवर्षी व यावर्षीचे कोरोना काळात हे शिवभोजन योजना सर्वसामान्यांना आधार ठरत असून संचालक राधेश्याम रहेकवल, शिवसेनेचे विनायक ढगे, बंडोबा सावंत, राजकुमार शेटे, नितीनसिंह सद्दीवाल, बाबा सराफ, एएसआय गोंविद बास्टे आदी यावेळी उपस्थित होते.
आठवडी बाजार बंद, व्यापारी संकटात
बीड : तालु्क्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत. बीड, नेकनूर, चौसाळा, पाली, लिंबागणेश तसेच इतर ठिकाणचे आठवडी बाजार बंद आहेत. केवळ भाजी, फळे व जीवनावश्यक वस्तू विक्रीस मुभा आहे; परंतु बाजार बंद असल्याने अन्य छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत.