कडा (बीड ) : सततचा पडणारा दुष्काळ, हाताला मिळत नसलेले काम आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे मानसिक दृष्ट्या खचून गेलेल्या एका शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पिंपळा येथे घडली. तुकाराम तात्याभाऊ म्हेत्रे (६०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील शेतकरी तुकाराम म्हेत्रे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गेल्या चारपाच वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने शेती पिकत नाही, हाताला कुठे काम नाही यामुळे प्रपंच चालवताना अनंत अडचणी उभा राहिल्या. यातच महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे व इतर काही कर्ज अशा कर्जाचा डोंगर वाढत होता. यातुन आलेल्या नैराश्यातुन स्वातंत्र्यदिनी तुकाराम म्हेत्रे यांनी गुरूवारी सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन करून जिवनयात्रा संपवली.त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.