बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे (वय ४०) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मतदान केंद्रावर मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १:३० च्या सुमारास घडली.
बीड शहरातील शिंदेनगर भागातील बाळासाहेब शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. २० नोव्हेंबर रोजी शहरातील गुरुनानक प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर असताना बाळासाहेब यांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तत्काळ शाळेजवळील एका दवाखान्यात नेण्यात आले व तेथून एका खासगी रुग्णालयात नेले असता, त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, बाळासाहेब शिंदे हे अखिल भारतीय छावा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष होते.
निवडणूक प्रक्रिया थांबणार का?निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना निवडणुकीतील एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास निवडणूक आचारसंहितेत असे निर्देश आहेत की, मृत्यू पावलेला उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असेल आणि त्या उमेदवारास पक्षाचा ए, बी फॉर्म प्राप्त झालेला असेल तरच निवडणूक प्रक्रिया स्थगित केली जाते.