- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई (बीड): राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पार्टी व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार रस्सिखेच सुरू असली तरी भाजपाचे धनंजय महाडीक हे निश्चितच निवडून येतील,असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमानिमित्त केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक गाजत आहे. भारतीय जनता पक्षाच्या धनंजय महाडीक यांना 32 मते भाजपाकडून मिळणार आहेत. तर उर्वरीत दहा मतांची आवश्यकता हितेंद्र ठाकूर व इतर अपक्ष आमदारांकडून पूर्ण होईल. पहिल्या व दुसर्या फेरीतील मतांच्या माध्यमातून महाडीक यांचा विजय निश्चित असल्याचे सुतोवाच आठवले यांनी केले.
अपक्ष प्रेमानेच आमच्या सोबत राज्यसभा निवडणुकीत आम्ही घोडेबाजार अथवा मतांची फोडाफोडी करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र असे काहीही नाही. राज्यातील अपक्ष आमदार प्रेमानेच भाजपाच्या पाठीशी उभे राहतील, अशी स्थिती आहे.
सामान्य शिवसैनिक नाराज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेला घरोबा सामान्य शिवसैनिकांना आवडलेला नाही. शिवसैनिकांना ही आघाडी मान्य नसल्याने याचा मोठा फटका पुढील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला बसणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
पुढच्या वेळी ४०० जागा जिंकणार केंद्र सरकारच्या विरोधात कसलाही रोष नाही.गेल्या आठ वर्षात अनेक लोकोपयोगी कामे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने केली आहेत. मोदींच्या विरोधात सर्व जण एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही. पुढच्या निवडणूकीत मोदी सरकार 400 पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येईल, असेही मंत्री आठवले यावेळी म्हणाले.