परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित केलेल्या जमिनीवर औद्योगिक क्षेत्र - २ अंतर्गत एमआयडीसी उभारण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान यासंदर्भात देसाई यांच्याशी चर्चा करून एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली होती.
त्यानुसार यासाठी अधिसूचित केलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार जमीन संपादित करण्याची प्रक्रिया उद्योग विभागामार्फत सुरू होती. धनंजय मुंडे स्वतः याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते.
दरम्यान, उद्योग विभागाने मोठा निर्णय घेत सिरसाळा एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिली.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. या भागातील सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढावे, इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळावा, यासाठी आपण कटिबद्ध आहोत. एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने परळीच्या विकासाबाबत पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्ण होताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.