बीड : जेमतेम २४ व्या वर्षी बनावट दारूच्या धंद्यात उतरलेल्या तरुणाने अवघ्या सहा महिन्यांत यंत्रणेच्या नाकावर टिच्चून बनावट दारूचा दुसरा कारखाना उघडला. येथील नवीन मोंढ्याजवळील बहिरवाडी शिवारात बनावट दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क व बीड ग्रामीण पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी संयुक्त छापा ( raid on fake liquor factory in Beed ) टाकला. टँगो, भिंगरी, रॉकेट, जॅकपॉट अशा चार ब्रँडची नावे वापरून बनावट दारू मद्यशौकिनांच्या घशात घातली जात होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
रोहित राजू चव्हाण (२४, रा. नवनाथनगर, एमआयडीसी, बीड) असे माफियाचे नाव आहे. तो फरार आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले, ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत व अंमलदारांनी २८ रोजी सकाळी ८ वाजता तेथे छापा टाकला. यावेळी कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार कुलूपबंद होते. कुलूप तोडून आत प्रवेश करत अधिकाऱ्यांनी झाडाझडती सुरू केली. बनावट दारूचे १६५ बॉक्स, स्पिरीट, ई-सेंस, मॅन्युअल सील मशीन, देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे बॉक्स असा एकूण २० लाख ५४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रात्रीतून बनायचे शंभर बॉक्सया कारखान्यात रात्रीच्या वेळी बनावट दारू बनविण्याचे काम चालायचे. रोहित चव्हाण याच्या कुटुंबातील सहा तर उर्वरित ८ ते ९ जण परप्रांतीय मजूर रात्रीतून शंभर बॉक्स दारू तयार करायचे, असे उत्पादन शुल्कच्या सूत्रांनी सांगितले. एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे ४ हजार ८०० बाटल्या तयार होत असल्याचा कयास आहे.
अमरावती, अकोला, जळगावात विक्रीजॅकपॉटच्या बनावट ब्रँडवर दहिसर डिस्टीलरीज, प्रा.लि. व्हिलेज सातीवली ता. वसई, जि. पालघर असा पत्ता आहे. रॉकेट देशी दारूच्या बॉक्सवर प्रवरा डिस्टीलरी, प्रवरानगर, जि. अहमदनगर असा पत्ता नमूद आहे. भिंगरी देशी दारू केएसके डिस्टीलरी कोळपेवाडी, जि. अहमदनगर) या नावाने विक्री केली जायची. चार ब्रँडची बनावट उत्पादने अमरावती, अकोला तसेच जळगाव येथे विक्रीसाठी पाठवली जात होती, असे समोर आले आहे.
कोणाचा वरदहस्त?दरम्यान, ७ एप्रिल २०२१ मध्ये नागापूर (ता. बीड) शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ८६ लाख १ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश केला होता. रोहित चव्हाण हा यात आरोपी होता. पुढे राज्य उत्पादन शुल्कच्या तपास अधिकाऱ्यालाच लाच प्रकरणात अटक झाली होती. नागापूर येथील छाप्याला सहा महिने होत नाहीत तोच रोहित चव्हाणने बहिरवाडीत बस्तान हलवून कारखाना सुरू केल्याचे उघड झाले आहे. त्याचे राजकीय कनेक्शन काय, कोणाचा वरदहस्त, हे तपासात समोर येईल.
तपासात अधिक माहिती समोर येईल महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये उत्पादन शुल्क विभागात एका आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे. तो फरार असून शोध सुरू आहे. गुन्ह्यात कोणा-कोणाचा सहभाग आहे, हे तपासात समोर येईल.- नितीन घुले, अधीक्षक, राज्य उत्पाद शुल्क, बीड