लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील कपीलधारवाडी येथे सोमवारी तीन दिवसांचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील गावांमधून प्रसुती झालेल्या महिलांची माहिती घेतली. तसेच सर्व स्त्री रूग्णालयांसह जिल्हा रूग्णालयाला पत्र देऊन माहिती मागविली आहे. अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती कसलाच धागादोरा लागलेला नाही.बीडपासून १० किमी अंरावर असलेल्या कपीलधार वाडी येथे काटेरी झाडाच्या आळ्यात तीन दिवसांचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले होते. त्याला ताब्यात घेत ग्रामस्थांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती ठणठणीत असून देखभालीसाठी महिला पोलीस आणि परीचारिका नियूक्त केल्या आहेत. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पालीचे पोलीस पाटील वैजिनाथ नवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.दरम्यान, मंगळवारी सकाळीच पोलिसांनी कपीलधारवाडीसह मंझरी, मांजरसुंबा, पाली, कोळवाडी, कपीलधार वाडी, आहेरवडगाव या गावांमध्ये जावून मागील चार दिवसांत प्रसुती झालेल्या महिलांची माहिती घेतली. तसेच जिल्हा रूग्णालय, परिसरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह बीड शहरातील सर्व स्त्री रूग्णालयांना पत्र पाठवून मागील चार दिवसांत जन्मलेल्या मुलींची यादी मागविली आहे. अद्यापर्यंत मात्र पोलिसांच्या हाती कसलीच माहिती मिळालेली नाही. हा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. तपास अंमलदार पोह जयसिंग वाघ म्हणाले, परिसरातील गावांची चौकशी केली आहे. रूग्णालयांनाही पत्र पाठवून मागील चार दिवसांत जन्मलेल्या मुलींची यादी मागविली आहे.कपीलधार वाडी परिसरात स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढलल्याचे गंभीर प्रकरण असतानाही याचा तपास हवालदाराकडे देण्यात आला होता. या संदर्भात लोकमतने पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याने याचा तपास करणे अपेक्षित असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्याकडे सोपविला आहे.
अर्भक प्रकरण; चार गावांमधून घेतली प्रसुतीची माहिती; रूग्णालयांनाही पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:21 AM