प्रभात बुडूख
बीड : आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्हा नियोजनमधून विविध कामांसाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून कामे करण्यासाठी ८४ लक्ष रुपये निधी देण्यात आला होता. दरम्यान, ही कामे २०२१ पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, कामे पूर्ण न करता ही रक्कम चेकच्या माध्यमातून विभागाच्याच ‘मेवाड’ या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये अपहार करण्याचा उद्देश असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
डीपीडीसीच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात बीड तालुक्यातील विविध कामांसाठी ८४ लक्ष रुपयांचा निधी सामाजिक वनीकरण विभागास देण्यात आला होता. दरम्यान, या माध्यमातून रोपवाटिका, संरक्षक भिंत (चेंनलिंक फेंनसिंग) व रस्ते, पाइपलाइन यासह इतर कामे या निधीच्या माध्यमातून मुदतीत करणे अपेक्षित होते. मात्र, जवळपास सर्वच ठिकाणी कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. तसेच हा निधी खर्च न करता मेवाड या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अशा प्रकारे रक्कम वर्ग करून अपहार करण्याची शक्यता असून, याप्रकरणी निधी व अखर्चिक रक्कम यासंदर्भातील चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी चिंचोलीमाळीचे सरपंच मनोज बेद्रे, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक हजारे व बाबुराव गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बीड तालुका सामाजिक वनीकरण विभागातील कामे अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे ठप्प झालेले आहेत. काही ठिकाणी निकृष्ट कामे करून निधी हडपण्याचा डाव आहे. तर, चिंचोली माळी येथील कामांचा पंचनामा करण्याची मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत करून जिल्ह्यातील सगळ्या कामांची चौकशी करावी.
दीपक हजारे, जाणता राजा प्रतिष्ठान, बीड