शिरूर कासार : तालुक्यातील १०८ गावांपर्यंत कोरोना पोहोचला असून, केवळ दोन गावे कोरोनापासून दूर आहेत. तालुक्यात एक व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड २० आहेत. मात्र, ही यंत्रणा सरकारी नसून, खासगी असल्याने सर्वसामान्य गंभीर रुग्णांना उपचारासाठी बीड, नगर किंवा औरंगाबाद गाठावे लागते. कोरोना महामारीने शिरूरसारख्या लहान तालुक्यात तेही ग्रामीण भागापर्यंत विळखा घातला आहे. आतापर्यंत १४१७ जण कोरोनाबाधित आढळले, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यात जवळपास ९५ महसुली, तर वाड्या वस्त्यांसह ११० गावांचा समावेश आहे. सुमारे १ लाख ३० हजार लोकसंख्या आहे. यात ३० टक्के मजूर ऊसतोडीसाठी स्थलांतरीत झालेला आहे. तालुक्यातील सांगळवाडी व डोळेवाडी या छोट्या वाड्यातही रूग्ण संख्या चिंताजनक बनली होती. उपचारानंतर आतापर्यंत १२७४ रूग्ण सुखरूप घरी गेले. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये ७०, तर वेगवेगळ्या ठिकाणी १०८ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना चाचणीबाबत आवश्यक त्या ठिकाणी शिबिर घेतले जाते. प्रशासन कोरोनाबाबत संवेदनशिल असून नागरिकांनी मात्र नियमावलीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. कामाशिवाय बाहेर फिरू नये. गेलातच तर मास्क जरूरी आहे. सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.
सक्षम आरोग्य यंत्रणेची गरज
शिरूरला प्राथमिक आरोग्य केंद्र, खालापुरीला उपकेंद्र, तर रायमोहा येथे ग्रामीण रुग्णालय असूनही पुरेशी व सक्षम आरोग्य यंत्रणा येथे उपलब्ध नाही. तालुक्यात शासकीय १०९, तर ७५ बेड खासगी आहेत. तालुक्यात कोरोना मुक्तीचे प्रमाण ९० टक्के असून, मृत्यू प्रमाण १.६ टक्के इतके आहे. कोरोनाच्या या वणव्याची झळ मात्र तिंतरवणी जवळ असलेल्या लमानवाडी एक व लमानवाडी दोनमध्ये बसलेली नाही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.
फोटो आळी : मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी शिरूर तालुक्यात ‘मिशन झिरो डेथ’अंतर्गत शिरूरसह ग्रामीण भागात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे.
===Photopath===
220421\vijaykumar gadekar_img-20210422-wa0029_14.jpg