लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा उतरणीला लागत असताना आष्टी तालुक्यातील आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. प्रशासनाचा लसीकरण, कोरोना चाचणीवर भर असताना जनजागृतीकडे दुर्लक्ष होत आहे. नियमांचेही पालन होत नसल्याने बाधितांची संख्या वाढत चालली आहे.
प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमाचे पालन होताना दिसत नाही. तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टन्स नाही, सॅनिटायझर नाही. यासह अनेक नियमांकडे नागरिक डोळेझाक करीत आहेत. आरोग्य विभाग अँटिजन आणि लसीकरण करीत असले तरी नियम डावलून फिरणाऱ्या लोकांवर कसलीच कारवाई होत नाही. शहरी भागात जेरीस आणलेल्या कोरोनाने ग्रामीण भागातील डोंगरपट्ट्यात शिरकाव केला आहे. नियम पायदळी तुडवत असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दीपक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नाकाडे, कृष्णा गायकवाड यांनी केली आहे.
.....
काय म्हणतात अधिकारी?
आष्टी तालुक्यातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्थानिक पातळीवर तलाठी, आशा वर्कर काम करीत आहेत. महसूल, पंचायत, पोलीस, आरोग्य विभागाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार शारदा दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
....
आपण तिसऱ्या लाटेच्या मार्गावर आहोत. नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोरोनाची काही लक्षणे जाणवली तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करावेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. जयश्री शिंदे यांनी सांगितले.
...
आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीच्या ग्रामसुरक्षा समितीला कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी सांगितले.